Ahmednagar News : राहुरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकामध्ये भाजपाकडे सुमारे दहा ग्रामपंचायती आल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक आघाडी केलेल्या दोन सरपंच देखील स्पष्टपणे भाजपाचे असल्याने या निवडणुकीमध्ये भाजपाचा वर चष्मा राहिला आहे.
महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मोठे यश प्राप्त केले आहे. नेत्यांच्या पाठबळामुळे तालुक्यातील चित्र लवकरच बदलेल अशी खात्री आता कार्यकर्त्यांना आहे.
काल राहुरी तालुक्यातील सुमारे २२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघातील १६ ग्रामपंचायत तसेच उत्तर लोकसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचा समावेश होता.
यामध्ये मुख्यत्वे ब्राह्मणी, म्हैसगाव, टाकळीमिया डिग्रस, देसवंडी या मोठ्या ग्रामपंचायतचा समावेश होता. या ठिकाणी नेत्यांबरोबर कार्यकत्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणुकीनंतर जनतेने जो कौल दिला तो भाजपाच्या दिशेने गेला आहे.
ब्राह्मणी येथे भाजपाचे कट्टे समर्थक सुरेश बानकर यांच्या पत्नीने विजय प्राप्त करून या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये भाजपाचा झेंडा रोवला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अस्तित्वाची लढाई निर्माण केली होती.
मात्र, यामध्ये भाजपा सरस ठरली. म्हैसगावमध्ये देखील भाजपाने आपला झेंडा रोवल आहे. डिग्रस या ठिकाणी देखील सत्ता बदल करून भाजपा सत्तेमध्ये आली आहे. कानडगाव, निर्भरे, चिचोली हे विखे- कर्डिले यांच्या माध्यमातून भाजपाचा बालेकिल्ले समजला जातो.
तेथे देखील भाजपाचा विजय झाला आहे. विखे-कर्डिले यांच्याबरोबरच खांद्याला खांदा लावून काम करणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते अँड.सुभाष पाटील यांनी धामोरी बुद्रुक व ब्राह्मणी या ठिकाणी आपल्या कार्यकत्यांना सक्रिय केल्याने या दोन्ही ठिकाणी भाजपाचा विजय सुकर झाला.
त्याचबरोबर शिलेगाव या ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. ३२ गावांमध्ये जे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये येतात, त्या ठिकाणी चिंचोली, माहेगाव गंगापूर येथे आपले वर्चस्व दाखवून विखे कर्डिले यांनी या भागात देखील यश मिळवले आहे.
या भागात भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांचा देखील प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे. आ. प्राजक्त तनपुरे यांनी बारागाव नांदूर सारखी आपली मोठी ग्रामपंचायत टिकून ठेवण्यामध्ये यश मिळले.
शरद पवार गटातील आ. तनपुरे यांनी कार्यकत्यांच्या माध्यमातून घोरपडवाडी, मोमीन आखाडा, बारागाव नांदूर, दरडगाव थडी, मुसळवाडी, तमनर आखाडा या सहा ग्रामपंचायतमध्ये आपले सरपंच निवडून आणण्यामध्ये यश प्राप्त केले आहे.
मात्र, या सर्वामध्ये स्थानिक आघाडी असणाऱ्या सडे, धामोरी खुर्द, टाकळीमिया, मालुंजा खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सरपंचांची भूमिका अजून गुलदस्तामध्ये आहे.
सडे येथील सरपंच विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांचे खंदे समर्थक व भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असले तरी त्यांनी या ठिकाणी विकास आघाडी केली असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही. कमळाच्या चित्राबरोबर त्यांची जाहिरातबाजी ही ते भाजपा समवेत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी सरपंच जरी वेगळ्या पक्षाचा असला तरी सदस्य संख्याबळ वेगळ्या पक्षाचे असल्याने अनेक सरपंचांना काम करताना मात्र अडचणी येणार आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपाचा वर्चस्व मिळण्यास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेच्या केलेल्या कामांना कौल मिळाला असे यातून स्पष्ट होत आहे.
सर्वसाधारणपणे बारा ग्रामपंचायत स्पष्टपणे भाजपकडे आल्या असल्याचे चित्र आहे. स्थानिक आघाड्या भाजपाला किती साथ देतात हे स्पष्ट झाल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल.
याउलट राष्ट्रवादीला स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून किती पाठबळ भेटते हे देखील बघणे गरजेचे आहे. आमदार-खासदार असणाऱ्या दोन्ही दादांचा मात्र या निवडणुकीमध्ये खासदार दादा वरचढ ठरले. जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी देखील कार्यकर्त्यांना बळ दिले असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.