राहुरी

कालवे दुरुस्तीसाठी निधी द्या: शंकरराव गडाख

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील उजवा कालवा एकूण ५२ किमी लांबीचा आहे. त्यावर शाखा कालवा क्रमांक १, शाखा कालवा क्रमांक २, पाथर्डी शाखा कालवा असे एकूण ३ शाखा कालवे आहेत, तसेच १८ किमी लांबीचा डावा कालवा आहे.

त्याद्वारे राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील ८० हजार ८१० शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री शंकरराव गडाख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत कालव्यांची विशेष दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नव्हती. ही बांधकामे ही जुनी झालेली नादुरुस्त अाहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.

तसेच काही ठिकाणी भरावांचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. उजवे कालवे, शाखा कालवा व वितरिकांचे अस्तरीकरण केलेले नसल्यामुळे भरावमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाझर होत आहे. पाण्याची गळती टाळण्यासाठी अस्तरीकरण करणे आवश्यक आहे.

त्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाला विशेष दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपये उपलब्ध करून घ्यावेत व हे कालवे नूतनीकरणाचे कार्यक्रम हाती घेण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी मंत्री गडाख, प्राजक्त तनपुरे, माजी अामदार चंद्रशेखर घुले यांनी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे केली.

कालवे नुतनीकरण व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास पाण्याची गळती दूर होऊन पाण्याची बचत होईल व शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होईल.

उत्पादन वाढेल याचा फायदा राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. जलसंपदा मंत्री पाटील, मंत्री गडाख, तनपुरे, घुले यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office