शहरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहर बकाल होत असल्याचे दिसून येत असून, मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर, ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांनी गटाराचे रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आंदोलनाला उधाण आलेले असून, फक्त देखाव्या पुरतेच आंदोलने सुरू असून, नागरिकांचे प्रश्न जैसे थे च आहेत. फक्त फोटो सेशन पुरतीच ही आंदोलन सुरु आहेत.
येत्या आठ दिवसांत स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने सुधारणा न केल्यास नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पत्राद्वारे नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये संबंधीत ठेकेदाराचा मनमानी कारभार व निष्काळजीपणामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे व नाल्यासुध्दा तुडुंब भरल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, याबाबत नगरपरिषद प्रशासनाला वेळोवेळी संपर्क साधूनही दखल घेतली जात नाही, त्याचा नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी या घाणीच्या साम्राज्याने डासांचे प्रमाण वाढत असल्यामुळे साथीचे आजार वाढलेले आहेत.
यावर नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करून संबंधीत ठेकेदारास नियमित स्वच्छतेच्या सुचना देऊन सुरळीतपणे स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच स्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, ही सर्व कामे आठ दिवसात न झाल्यास नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.