अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- शेवगाव तालुका सध्या समस्यांच्या विळख्यात सापडू लागला आहे. लोकप्रतिनिधींनी तर तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहेच मात्र आता नगरपालिकेवर देखील पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील नगरपालिकेच्या मुदत संपल्यावर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. शेवगावच्या नगरपालिकेवर ही प्रशासक नेमण्यात आला आहे.
परंतु, प्रशासक नगरपालिकेत येत नसल्याने इतर अधिकारी देखील मनमानी कारभार चालवीतात. कर्मचारी वर्गाला सूट मिळाली आहे. यामुळे शेवगावातील प्रत्येक वार्डात केर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत असून कोठेही साफसफाईची कामे होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्यावरील व वार्डातील स्ट्रीट लाईट ठीक ठिकाणी बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून चोऱ्या व लुटमारीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशी अवस्था शेवगाव शहराची झाली असून नगरपालिकेत तक्रार दिल्यानंतरही अधिकारी काम करीत नाही. किंबहुना प्रभारी अधिकारी शेवगावकडे फिरकत देखील नाही.
अधिकाऱ्यांकडून कामाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केली जात असून जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेण्याकरिता पालिकेत जबाबदार अधिकारी नसल्याचे दिसून येत आहे.
शेवगावातील जनतेचे आरोग्य धोक्यात येत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करावा तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांना हजर राहणे बाबत समज द्यावी अशी मागणी शेवगावच्या जनतेने प्रशासनाकडे केली आहे.