धक्कादायक ! प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमतिपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात मागील महिन्यांत 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले.

त्यात 36 गावांतील 45 नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. 45 दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक 8 नमुने पारनेर, तर प्रत्येकी 7 दूषित नमुने पाथर्डी, राहुरी तालुक्यात आढळलेले आहेत.

त्यानंतर नगर तालुक्यात 6 दूषित नमुने आढळले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो.

जून महिन्यांत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांतील 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. यातील 45 नमुने दूषित आढळले आहेत. या गावांत आढळून आले दूषित पाणी नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर, खिरविरे, देवठाण, संवत्सर, कोळपेवाडी, हतालखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा,

सांगवीसूर्या, खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी, सूलतानपूर खु., आव्हाने बु., आखेगाव, शेकटे खु., विजापूर,अस्तगाव, शिलेगाव, तांदूळवाडी, अंमळनेर, चांदेगाव, जातक, राजापूर, वडगाव पान अशा 36 गावांत 45 पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.

मात्र हि जबाबदारी प्रशासनाची असतानाही प्रशासनाकडून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होऊ लागले आहे. यातच सध्या कोरोना सारख्या महामारीशी नागरिक झगडू लागले आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24