श्रीगोंदा

….जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण केले. निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात, आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात.

आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या मागणीसाठी सोमवारी हिवरेझरे (ता. नगर) याठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले.

यावेळी उपस्थित बाबा महाराज झेंडे म्हणाले, आम्ही आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी सांगितले आंदोलन थांबवा, आम्ही पाणी मिळवून देतो.

पण आता साकळाईला डावलून पाणी पारनेर आणि कर्जत जामखेडला नेण्याचा डाव सुरू आहे. असे झाले तर मंत्री, अधिकारी, यांना घेराव घालू, असा इशारा झेंडे महाराज यांनी दिला. झेडपी सदस्य बाळासाहेब हराळ म्हणाले, नगर तालुक्यातील स्वतः चा आमदार, खासदार नाही.

त्यामुळे नगर तालुक्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे. तीन टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. साकळाई पाणी योजनेची मागणी 25 वर्षांपासूनची आहे. जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office