श्रीगोंदा

अरेअरे…! ‘तो’ चिमुकला बोरं काढण्यासाठी गेला अन् दुर्दैवाने परत आलाच नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  एक वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने काळाने मातृत्वाचे छत्र हिरावून घेतल्याने पोरक्या झालेल्या एका ११ वर्षाच्या चिमुकल्याचा झाडावरील बोरं काढताना तोल जावून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे घडली.

अभिषेक बाळू लकडे असे या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह लकडे परिवारावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे परिसरातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे हा विहिरीच्याकडेला असलेल्या एका बोराच्या झाडावरील बोरे काढण्यासाठी गेला होता.

मात्र या दरम्यान त्याचा तोल गेला अन् तो थेट विहिरीत पडला त्यामध्येच त्याचे दुर्दैवी निधन झाले. बराच वेळ होवून देखील तो तरी घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध केली.

या दरम्यान विहिरीच्याकडेला त्याची चप्पल दिसून आल्याने संशय आल्यामुळे विहिरीमध्ये पाहिले असता तो विहिरीत पडल्याचे दिसून आल्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले.

मात्र अभिषेकचा या दरम्यान मृत्यू झाला होता. तो येथील खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. दोन वर्षापूर्वीच त्याच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

Ahmednagarlive24 Office