Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेवून ३ दिवस वाढविण्यात आली आहे.
विसापूरलाही पाणी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी मागील पाच दिवसापासून पाठपुरावा केला होता.
त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तसेच आ. बबनराव पाचपुते यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून या आवर्तनाचा कालावधी वाढवावा अशी विनंती करुन मागणी केली होती. याबाबत कुकडी कालवा सल्लागार समितीमध्ये ६ दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतू श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता या कमी कालावधीच्या आवर्तनामुळे पुर्ण सिंचन होणे शक्य नव्हते ही बाब मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी आणून दिली.
आवर्तनाचा कालावधी आता ९ दिवसांचा झाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळालच पण यापेक्षाही महत्वाचे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरलाही पाणी वळविण्याच्या सुचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून आधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे नाहटा यांनी सांगितले.