श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला; मात्र, याबाबतची कुणकुण लागताच तो कर्मचारी पळून गेल्याने लाचलुचपत विभागाची कारवाई फेल गेल्याच्या चर्चेला श्रीगोंद्यात उधाण आले होते.
याबाबत चर्चेतून मिळालेल्या माहिती अशी की, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका नागरिकाला शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती
याबाबत संबंधित इसमाने अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार बुधवारी (दि.१३) रोजी संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता.
या सापळ्याची कुणकूण शासकीय कर्मचाऱ्याला लागताच त्याने तहसील कार्यालयातून धुम ठोकल्याची माहिती मिळाली.मात्र, या फसलेल्या कारवाईच्या चर्चेला श्रीगोंद्यात उधाण येत असतानाच लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार की नाही ?
अशी देखील चर्चा सुरू आहे. याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी असा कोणताही सापळा रचल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला नाही.