मशीनवर सुरू होता ‘मावा’ उद्योग; पोलिसांनी मारला छापा, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्यांचा वापर करून मशीनवर मावा तयार करून विक्री करण्याचा उद्योग कोतवाली पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केला.

याप्रकरणी मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील मजनु शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे पसार झाले आहेत. पोलीस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे.

या छाप्यात एक टेम्पो, सुगंधी तंबाखू, मावा बनविण्याचे मशीन, बारीक सुपारी, चुना असा चार लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केडगाव उपनगरातील वैष्णवीनगर भागात एका घराच्या परिसरात काही इसम सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्याचे मिश्रण करून मशीनवर मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी गुन्हे शोध पथकाला सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त करून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.