अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- सध्या रशिया व युक्रेन या दोन देशात युध्द सुरू आहे. या दरम्यान युक्रेन या देशात मोठ्या संख्येने भारतातील व नगरमधील देखील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेेले आहेत.
परंतु युध्दजन्य परिस्थितीमुळे या देशात सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने हे सर्वजण तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे इकडे सर्व पालक चिंतेत असतानाच एक सुखद बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे या सर्व विषम स्थितीत पाथर्डी तालुक्यातील एक विद्यार्थिनी सुखरूप भारतात परतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील पुजा बोरूडे ही विद्यार्थिनी वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली होती.
परंतु दरम्यानच्या काळात कोरोनामुळे ती परत मायदेशी परतली. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तेथील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने ती नुकतीच युक्रेनला परत गेली होती.
परंतु काही दिवसांतच हे युध्द सुरू झाले व परत सर्व ठप्प झाले. तशी पुजाने भारतात येण्याची धडपड सुरु केली. विमानाचे तिकीटाचे दर नव्वद ते सत्तर हजार रुपयापर्यंत गेलेले.
त्यातच घरची परिस्थिती बेताचीच अखेर अथक प्रयत्नानंतर तिला विमानाचे तिकीट मिळाले. सध्या ती दिल्ली येथे सुखरूप पोहोचली असून तेथून रेल्वेने मुंबईला येत आहे.