अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची चाहुल लागली आहे. यामुळे तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते कामाला लागले आहे.
यातच ना. शंकरराव गडाख व उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तरूण नेतृत्वही सक्रिय सहभागी होणार आहे.
विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख खेवरे यांचे सुपुत्र ओंकार खेवरे यांची राजकारणात ही पहिलीच ‘एण्ट्री’ होणार आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गाव तेथे शाखा हे पक्षीय धोरण आखण्यात आले आहे.
गावोगावी शिवसेनच्या शाखा स्थापनेचा धडाका सुरू झाला आहे. या ग्रामीण भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या निवडणुकीत शिवसेनेला आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे.
त्यासाठी आता शिवसेना जय्यत तयारीनिशी उतरणार आहे.
जर तालुक्यात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली या निवडणुका होणार असतील तर शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागणार असल्याची चर्चा होत आहे.