अहमदनगर दक्षिण

…तर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गेटबंद करणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात ऊस तोडणीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल आहेत. नगर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊस तोडणीकडे पाठ फिरवून शेजारील जिल्ह्यातील कमी भावात मिळणार्‍या ऊसाच्या फडावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

त्या भागात शेतकर्‍यांच्या मातीमोल भावात ऊस घेऊन नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी नफेखोरीसाठी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पुन्हा ऊस तोडणी गतीमान करावी,

अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यात जाऊन शेतकर्‍यांसमवेत गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मोरे यांनी म्हटले, नगर जिल्ह्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी गेल्या २० ते २५ वर्षापासून मिळेल त्या भावात जिल्ह्यातीलच साखर कारखानदारांना ऊस पुरवठा नित्यनियमाने केला आहे. या व्यवहारात शेतकर्‍यांनी नफेखोरी बघितली नाही.

त्याचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मातीमोल भावात शेतकर्‍यांचा ऊस तोडून नेला. मात्र, यंदा नगर जिल्ह्यानजिकच्या जिल्ह्यातील गंगापूर परिसरातील काही शेतकर्‍यांनी अत्यंत कमी दरात ऊस पुरवठा केला आहे. त्यामुळे आपला गल्ला भरण्यासाठी नगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी येथील ऊस तोडणी थांबवून गंगापूर भागातून ऊस तोडणी सुरू केली आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाण ऊस तोडणी थांबली आहे. आता या शिल्लक ऊसाचे करायचे काय? असा मोठा प्रश्‍न हताश झलेल्या शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कर्ज उभारणी, उसनवार करून व सोन्याच्या ऐवजी खासगी सावकारांकडून गहाण ठेवून ऊसाच्या शेतीसाठी पैसा उपलब्ध केला आहे.

त्यातून यंदा गळीतासाठी नगर जिल्ह्यात ऊस तोडणीला ग्रहण लागले. अनेक शेतकर्‍यांकडे ऊस तोडणीसाठी पैसे मागितले. एकरी १० ते १५ हजारा रूपये या ऊस तोडणी करणार्‍या टोळ्यांनी शेतकर्‍यांकडून उकळले. त्याकडे संबंधीत साखर कारखान्याच्या प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले.

शेतकर्‍यांचे साखर कारखानदार आणि ऊस तोडणी मजूरांकडून आर्थिकदृष्ट्या वस्त्रहरण होत असताना आता नगर जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या टोळ्या जिल्ह्यातीलच साखर काराखानदारांनी काढून घेतल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वाळलेले आणि ऊसाला तुरे आलेली ऊसाची शेती पाहून आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

शेतकर्‍यांवर साखर कारखानदारांनी मोठे आर्थिक संकट टाकले आहे. त्यामुळे आता या ऊसाचे करायचे काय? असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकारी शिकवण्यासाठी व आडमुठ्या साखर सम्राटांना ताळ्यावर आणण्यासाठी नगर जिल्ह्यात मोठे तीव्र आंदोलन उभारण्याचा पावित्रा घेतला आहे.

येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यात पुन्हा ऊस तोडणी सुरू करण्याची आमची मागणी असून ती त्वरीत पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यात शेतकर्‍यांसमवेत जाऊन गेटबंद आंदोलन करण्यात येेणार आहे.

या आंदोलनाला जर हिंसक वळण लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत साखर सम्राट व पर्यायाने राज्य सरकारवर राहणार असल्याचा इशारा रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office