अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भर पेठेत असलेले दारूचे दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि लाखों रुपयांची रोख रक्कम पळवून नेली.
मनप्रितसिंग कथुरिया यांचे राहुरी शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारूचे दुकान आहे. या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी रात्री मनप्रितसिंग कथुरिया हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजे दरम्यान दोघां चोरट्यांनी शटरचे दोन्ही कुलूप तोडले.
यावेळी एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला तर एकजण बाहेर थांबला होता. दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानाची उचकापाचक केली.
यावेळी ड्राव्हर मधील सुमारे सहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. कथुरिया सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. राहुरीच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
मात्र कोणताही सुगावा लागला नाही. मनप्रितसिंग कथुरिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत दोन अज्ञात चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.