अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे करून तीन वर्षांपासून पसार झालेल्या दोन गुन्हेगारांना नगर तालुका पोलिसांनी पुण्यात अटक केली.
संतोष कोंडीराम मोहिते (वय 28 रा. डोंगरतळा जि. नांदेड) व विकी शिवाजी जाधव (वय 22 रा. जिंतूर जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सन 2018 मध्ये जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे घडले होते. याप्रकरणी एका गुन्ह्यात भादंवि कलम 392, 34 प्रमाणे व दुसर्या गुन्ह्यात भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे मोहिते व जाधव यांनी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन्ही आरोपी गुन्हे दाखल झाल्यानंतर पसार होते.
गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा तपास लागलेला नव्हता. दरम्यान या दोन्ही आरोपींविषयी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी माहिती काढली असता ते पुणे शहरात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
सहायक निरीक्षक सानप यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी पुणे शहरात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.