अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर- ठाणे जिल्ह्याला जोडला जाणारा घाटघर- चोंढे (देवीचा घाट) हा रस्ता प्रकल्प केवळ कागदावरच दिसून येत असून हा रस्ता प्रकल्प फक्त कागदावरच उरला आहे. या रस्त्याचा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याचे आवाहन आदिवासी बांधव करत आहेत.

अहमदनगर व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर घाटघर ते चोडे हा ९ कि.मी.चा घाट रस्ता अनेक वर्षांपासुन प्रलंबित आहे. हा रस्ता मार्गी लागावा म्हणुन अकोले तालुक्यातुन स्व. लोकनेते अशोकराव भांगरे, अकोले तालुक्‍याचे आमदार किरण लहामटे, माजी आमदार बैभवराव पिचड तसेच शहापुर तालुक्‍यातील आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी कसोशिने प्रयत्न केले.

त्यांच्या प्रयत्नण्यांना यश म्हणून कामाला मंजुरी मिळुन सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन सव्र्व्हेक्षणाच्या निविदाही काढल्या गेल्या. यासाठी मोठा निधीही मंजुर करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातून या कामाचे सर्व्हेक्षणही पूर्ण झाले;

मात्र ठाणे जिल्ह्यातुन या सव्र्व्हेक्षणाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन विशेष महत्त्वच दिले गेले नाही. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच असुन प्रत्यक्षात काम सुरु होण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार? हेच समजण्यास मार्ग नाही.

हा रस्ता मार्गी लागला तर मुंबईला जाण्यासाठी अकोले संगमनेरच्या नागरिकांना अतिशय जवळचा रस्ता होणार आहे. तसेच या नागरीकांचा ६० ते ७० कि.मी.चा जास्तीचा प्रवास वाचणार असुन वेळेतही बचत होणार आहे. मुंबईसारखी अति महत्वाची हक्काची बाजारपेठ अकोले- संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.

मुंबईचा निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात भंडारदऱ्याला पावसाळ्यात निसर्गाच्या विविध लिला पाहण्यासाठी येत असतो. त्याला त्यासाठी कसारा घाटातुन प्रवास करावा लागतो. कसारा घाटाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्याने भंडारदऱ्याला पोहचेपर्यंत त्याच्या नाकीनऊ येते.

जर घाटघर-चोंडे हा घाट जर फुटला तर मुंबईचा निसर्ग प्रेमी भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात ये-जा करणार आहे. भंडारदऱ्याच्या निसर्गात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई, ब्रिटीशकालीन धरण भंडारदरा, आशिया खंडातील दोन नंबरची दरी सांदन दरी, या शिवाय पावसाळ्याती पर्यटकांना भुरळ पाडणारे धबधबे लपलेले आहेत. हा करिष्मा पाहण्यासाठी हा घाटमार्ग फुटणे महत्वाचा आहे. त्यामुळे भंडारदऱ्याचे पर्यटन फुलणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणुन घाटघर हे गाव समजले जाते. या गावाच्या आसपास मोठ्‌या प्रमाणात आदिवासी जनता राहते. पावसाळ्यात प्रचंड पाऊस तर उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही अशी अवस्था या भागाची आहे.

तर नागरीकांना फक्त शेतीवरच उपजिविका करावी लागते. त्यामुळे या बांधवांकडे आर्थिक श्रोत अतिशय कमी आहे. या भागातील अनेक नागरीक कामासाठी थेट नारायणगावला जातो. जर घाटघर येथील देवीचा घाट ते चोंडे हा घाट फुटला तर निश्चितच या नागरीकांना मुंबई जवळ होऊन हाताला काम मिळण्यास हातभार लागणार आहे.

म्हणुनच घाटघर चोंढे हा घाट रस्ता फुटणे किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते. शासनाकडुन विशेषतः अकोले आणि शहापुर या तालुक्यातील आमदारांनी विधीमंडळात पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवुन आदिवासी जनतेचा मागणीला न्याय देणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe