विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली.
राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी राहाता, शिर्डी, पिंपळवाडी, पुणतांबा या परिसरात पावसाने हजेरी लावली. राहाता परिसरात तासभर पावसाची रिमझिम सुरु होती. थंड वारे आणि पाऊस व त्यात विजेचा गडगडाटही सुरु होता. या पावसाने शेतात काढून ठेवलेले कांदे झाकून ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली.
अस्तगाव भागात पावसाचे किरकोळ आगमन झाले. तळपत्या सुर्याचा पारा ४१ अंशापर्यंत गेला होता. तीव्र उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते; परंतु काल दुपारनंतर पडलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. हा हवेतील गारवा सर्वांनाच सुखावून जात होता. कडक उन्हात अंगांची लाही लाही करणाऱ्या आग ओकणाऱ्या सुर्याच्या तीव्र चटक्यातुन काल सुटका झाली.
पाऊस सुरु असताना अनेकांनी पावसात भिजण्याचाही आनंद घेतला. सध्या द्राक्षे बागांवर द्राक्षे परिपक्व होऊन काढणी ७० टक्के झाली आहे. अजुन ३० टक्के बागांवर माल आहे. या बागा थोडक्यात बचावल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.