अहमदनगर बातम्या

‘अहमदनगर अर्बन’ चे गार्‍हाणे दिल्ली दरबारी!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  नगर अर्बन बँकेच्या व्यवहारावर रिझर्व बँकेने निर्बंध लादले आहे. हे निर्बंध मागे घेतले जावेत, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने निर्बंध उठण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून थेट नवी दिल्लीतच फिल्डींग लावली आहे.

शुक्रवारी सकाळी शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे शब्द टाकण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर हे शिष्टमंडळ दिल्लीतील अन्य वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेणार आहे.

या भेटींचे फलित काय निघणार, याकडे बँक वर्तुळाचे लक्ष आहे. रिझर्व्ह बँकेने अर्बनवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादत व्यवहारांवर मर्यादा आणली आहे.

या काळात सभासदांना दहा हजारांपेक्षा अधिक ठेवी काढता येणार नसून बँकेला नव्याने कर्ज वाटप अथवा ठेवी देखील स्वीकारता येणार नाही.

बँकेवर नव्या संचालक मंडळाची निवड होताच, हे निर्बंध आल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर नूतन संचालक मंडळाने हे निर्बंध हटवले जावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शुक्रवारी सकाळी बँकेचे संचालक महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी यांनी नवी दिल्लीत केद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. यावेळी संचालक राहुल जामगावकर व अ‍ॅड. राहुल जामदार उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office