Ahmednagar ZP News : गट,गणांची होणार मोडतोड; अनेकांच्या मनात सुरु झाली …

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-   जिल्ह्या परिषदेच्या निवडणुका म्हणजे मिनी मंत्रालयाच्या निवडणूका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण झाले आहेत.

या गट व गणांचा कच्चा आराखडा बुधवारपर्यंत (ता. ९) सादर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कच्च्या आराखड्यानुसार पाथर्डी व अकोले तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्‍यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०११ च्या जणगणेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. कोरोनामुळे २०२१ ची लोकसंख्या झालेली नाही परंतु लोकसंख्येची नैसर्गिक वाढ लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे गट आणि गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या सुमारे साडेपाच लाखांनी वाढली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे ७३ गट, तर १४६ गण होते.

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.

आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे नवीन गट आणि गणांची रचना करण्यासाठी सध्याचे गट आणि गणांची मोडतोड होणार आहे.

राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक ८५ गट व १४ पंचायत समित्यांसाठी १७० गण निश्‍चित करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्हा राज्यात सर्वात मोठा असल्याने जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गण सुद्धा सर्वाधिक राहणार आहेत.

गट-गणरचना अशी होणार जाहीर :- नवीन गट आणि गणांची संख्या लक्षात घेऊन गट आणि गणांचा कच्चा आराखडा तयार करून बुधवारी (ता. ९) प्रत्यक्ष सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुकास्तरावर पंचायत समिती गणांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

गणांचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषद गटांचा कच्चा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.

त्यानंतर राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणरचनेचा कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करणार आहेत.