Ahmednagar News : जिल्ह्यातील ३५ लाख ७१ हजार ३१२ मतदार संख्या असलेली प्रारूप मतदार यादी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. या मतदार यादीत आपले नाव आहे का? हे मतदारांना तपासता येणार आहे.
शिवाय नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मागील तीन महिन्यांपासून मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या.
अखेर शुक्रवारी (दि. २७) जिल्ह्यात ३५ लाख ७१ हजार ३१२ मतदार संख्या असलेली प्रारूप यादी प्रत्येक प्रांताधिकारी, तहसील कार्यालय तसेच जिल्हाभरातील ३ हजार ७३१ मतदान केंद्रांवर प्रसिद्ध केली आहे. मतदारांनी आपले नाव या मतदार यादीत आहे की नाही, याची पडताळणी करावी.
नसेल तर नाव समाविष्ट करणे, नाव वा पत्त्यात बदल करणे, नावांची वगळणी आदींबाबत नमुना क्र. ६, ७, ८ व ८ अ भरून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२४, १ एप्रिल २०२४, १ जुलै २०२४, १ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी नमुना ६ अर्ज भरून द्यावा. त्या-त्या अर्हता दिनांकास त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील.
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. त्या २६ डिसेंबर रोजी निकाली काढल्या जातील. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचे अवलोकन करून आवश्यक ती सुधारणा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
ग्रामसभेत होणार मतदार यादीचे वाचन
■ प्रत्येक गावात प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीचे विशेष ग्रामसभेत वाचन केले जाईल.
■ त्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत ग्रामसभा आयोजित करायची आहे.
■ यात नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी होईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले, लग्न होऊन गेलेल्या स्त्रिया यांची नावे वगळली जातील.
■ शिवाय युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेत नोंदवा नाव
नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच यादीतील दुरुस्तीसाठी ४, ५,२५ व २६ नोव्हेंबर असे चार दिवस विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रत्येक गावातील वार्डातील मतदान केंद्रावर ही विशेष मोहीम राबवली जाईल, असेही प्रशासनाने जाहीर केले आहे.