आपण बऱ्याचवेळा वावर हाय तर पॉवर हाय अशी वाक्ये ऐकली असतील. परंतु ही वाक्ये खरी करायला लागते जिद्द व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विक्रमी उत्पादन घेता येते हेच जणू सिद्ध केलंय अहमदनगरमधील शेतकऱ्याने.
श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव येथील शेतकरी भाऊसाहेब भानुदास उबाळे यांनी सौर ऊर्जेवरील दोन कृषी पंप शेतात बसवले व विजेच्या लपंडावावर मात करत त्यापासून कायमची मुक्ती मिळवली. या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपावरच त्यांनी जवळपास साडेपाच एकर कांदा पिकवला.
यातून त्यांना कांद्याचे चांगले उत्पन्नही मिळाले. त्याला वेळेवर पाणी मिळाले आणि कांद्याचे जोमदार पीक आले. साडेपाच एकरात १ हजार ७५० गोणी कांदा निघाला. यामधून सध्याच्या बाजारभावानुसार ११ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले.
उबाळे यांचे १३ एकर क्षेत्र असून या त्यांनी ऊस आठ एकर, पाच एकर कांदा पिकवला होता. उसातून १२ लाखांचे उत्पन्न निघाले. वीज टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय अनुदान योजनेतून सौर ऊर्जेवरचे तीन एचपीचे दोन कृषी पंप बसविले.
यासाठी ३२ हजारांचा खर्च आला आणि सौर ऊर्जा सिस्टममुळे कृषी पंपाचे वीज बिल कमी झाले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे पद्धतीने साडेपाच एकर गावरान कांदा लागवड केली. शेणखताबरोबर रासायनिक खताची मात्रा दिली. कीटकनाशक फवारणी केल्या.
सौरऊर्जा कृषीपंपामुळे कांदा पिकाला पाणी वेळेवर मिळाले. त्यामुळे एका कांद्याचे वजन सरासरी दोनशे ग्रॅम झाले. कलरही चांगला आला. सध्या कांद्याचे भाव कोसळले असले तरी कांद्याचे एकरी उत्पादन चांगले निघाल्याने एकरी दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. खर्च वजा जाता साधारण पाच ते सहा लाखांचा नफा त्यांना झाला आहे.
विजेच्या लपंडावामुळे कृषी पंप चालत नाही. पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही की उत्पादनात घट होते. परिणामी, शेतीचे नफा-तोट्याचे समीकरण बिघडते. शेतकरी नाराज होतात. शासनाच्या अनुदान योजनेतून दोन कृषी पंप बसविले आणि वीजटंचाईची चिंता संपली.
शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवरचे कृषीपंप बसविले तर निश्चित फायदा होतो असे मत शेतकरी भाऊसाहेब उबाळे यांनी व्यक्त केले आहे.