Ahmenagar Breaking : नगरमध्ये निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करुन लुटले, सुटकेसाठी १५ लाख मागितले

kidnap

Ahmenagar Breaking : नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच, त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता त्याने गाडीतून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली.

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय २५, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा, हल्ली रा. सुभश्री आपार्टमेंट, गुलमोहर रोड) असे या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिरुध्द हा निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठलराव जरे यांचा मुलगा असून तो शिक्षण घेत आहे.

जरे यांची शिंगवे तुकाई (ता. नेवासा) येथे शेती आहे. गुरुवारी (दि. २३) ते त्यांच्या वडिलांसह शेतीची पहाणी करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नातेवाईकाबरोबर ते पांढरी पूल येथे आले. तेथे बसची वाट पाहत असताना एका कार मधून आलेल्या दोघांनी त्यांना नगरला सोडतो, असे सांगितल्याने ते गाडीत बसले.

घाट चढून इमामपूर येथे आल्यावर अनिरुद्ध याला बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील चेन व हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. त्याचा फोन घेऊन त्यात दोघांनी त्यांचे सिमकार्ड टाकले व त्याच्या वडिलांना फोन लावून १५ लाखांची खंडणी मागितली. गाडी पाथर्डी रस्त्यावर तिसगाव जवळ थांबल्यावर अनिरुद्ध याने लघुशंकेचा बहाणा करत गाडीतून पळ काढला. एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या फोनवरून त्याने वडिलांशी संपर्क साधला व स्वतःची सुटका करून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

गाडीतील दोघांनी अनिरुद्ध याच्या गळ्यातील गळ्यातील चेन व हातातील सोन्याची अंगठी, मोबाईल, पाकीट काढून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात २ इसमांविरुद्ध भा. दं. वि. कलम ३६४ (अ), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत