ऐन दिवाळीत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने शहर आणि परिसरात हाती घेतलेली अतिक्रमण हटाव मोहिम राबवून सर्वसामान्यांच्या चुलींवरच गंडांतर आणले आहे.

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी हटवली. दोन हातगाड्या मनपाने जप्त केल्या आहेत. पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील बाजारपेठा आता गर्दीने फुलून गेल्या आहेत. सणानिमित्त पूजेचे साहित्य, पणत्या, कपडे, फराळ आदी साहित्य व पदार्थ विक्रेते शहरातील प्रमुख मार्गांवर विक्रीसाठी बसले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

यावेळी कोतवाली पोलिस, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख व अर्जुन जाधव उपस्थित होते. गंजबाजार, मोचीगल्ली या भागात विक्रेत्यांच्या ताडपत्री काढण्यात आल्या. कापडबाजार, माणिक चौक, माळीवाडा ते वाडिया पार्क या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत दोन हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पुढील कालावधीतही सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण विरोधी विभागाने सांगितले. दीनदुबळ्यांवरच चालतो पोलिसांचा दंडुका.. हातगाडीवर फळांसह विविध वस्तूंची विक्री करुन मोडका तोडका प्रपंच चालविणारे हे लोक सामान्य कुटुंबातले आहेत.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या लोकांकडे काहीच मार्ग नाही. मात्र स्वत:सह कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी हे लोक काम करतात. दुसरीकडे अवैध धंदे करणारे मात्र मोकाट असून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24