अहमदनगर बातम्या

ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- एकीकडे दररोज पाऊस पडत असल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे मुबलक पाऊस असताना देखील पिण्याच्या पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच नळावाटे मैलामिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने याबाबत वारंवार तक्रार करुनही समस्या सुटत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला.

महापालिकेच्या प्रभाग १० मधील भारस्कर कॉलनी, लालटाकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमीत पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसराजवळच जिल्हा परिषद वसाहतीमध्ये महापालिकेची पाण्याची उंच टाकी आहे. तरीही या भागाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अनियमीत पाणीपुरवठ्या बरोबरच नळावाटे दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी या प्रभागाचे नगरसेवक अक्षय उनवणे यांच्याकडे तक्रारी केल्या. नगरसेवक उनवणे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगूनही त्यांच्याकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे नगरसेवक उनवणे यांनी परिसरातील नागरिक व महिलांच्यावतीने महापालिकेवर हंडा मोर्चा नेला होता. यावेळी आयुक्तांना समस्यांचे निवेदन देण्यात आले.

Ahmednagarlive24 Office