अकोले बसस्थानक असुरक्षित ! महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न, अन्यथा, अकोल्यातही ‘स्वारगेट’….

Published on -

अकोले, ८ मार्च २०२५: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, अकोले बसस्थानकात सुरक्षेच्या अत्यंत ढिसाळ स्थितीमुळे येथेही अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अकोले बसस्थानक हे आदिवासी भागातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून येथे हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने प्रशासकीय कार्यालये, न्यायालय, बँका, रुग्णालये, शिक्षणसंस्था यांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. आठवडे बाजाराच्या दिवशी तर गर्दी अधिकच वाढते. मात्र, या महत्त्वाच्या बसस्थानकात ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना पोलिस चौकी, ना सुरक्षा रक्षक, ना पार्किंगची सोय! परिणामी महिलांच्या पर्स, दागिने व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः महिला व तरुणींच्या छेडछाडीच्या घटना चिंता वाढवणाऱ्या ठरत आहेत.

सुरक्षेच्या अभावामुळे महिलांची असुरक्षितता

संपूर्ण बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी केवळ दोन कर्मचारी कार्यरत असतात, तेही गेटवर. यामुळे प्रवाशांचे संरक्षण पूर्णपणे दुर्लक्षित आहे. पोलिस बंदोबस्त नसल्याने बसस्थानक परिसरात चेन स्नॅचिंग, खिसेकापू, पर्स चोरीसारख्या घटनांना उत आला आहे. महिलांना उद्देशून अश्लील टिप्पणी करणे, विद्यार्थिनींना त्रास देणे असे प्रकारही सर्रास घडत आहेत.

बसस्थानकात पोलिस चौकी आवश्यक

अकोले बसस्थानकात अद्याप पोलिस चौकी स्थापन झालेली नाही. त्यामुळे पोलिसांची उपस्थिती जवळपास शून्य आहे. परिणामी, गैरप्रकार करणाऱ्यांचे फावते. प्रवाशांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी येथे तातडीने पोलिस चौकी आणि सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक आहे.

पार्किंग व पिण्याच्या पाण्याचा अभाव

या बसस्थानकात पार्किंगसाठी कोणतीही अधिकृत जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवासी तसेच व्यापारी मनमानी पद्धतीने वाहने उभी करतात, यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. शिवाय, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

प्रशासनाची आश्वासने पण कृती शून्य?

अकोले बसस्थानकाच्या पुनर्विकसनानंतर हिरकणी कक्ष, पोलिस चौकी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी सांगितले. तसेच, सुरक्षा रक्षकांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून, मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर योग्य व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा प्रश्न केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहणार की प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार, याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा, अकोल्यातही ‘स्वारगेट’सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe