अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

Updated on -

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. टी.च्या सेवांचा वापर करतात; मात्र अकोले आगार प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

कसाऱ्याला जाणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी भरलेल्या असतात, पण तरीही मोडकळीस आलेल्या बसेस या मार्गावर सोडल्या जात आहेत. शनिवारी आणि रविवारी अकोले आगाराने एमएच १४ बीटी ४३८५ ही बस कसाऱ्यासाठी पाठवली होती. ही बस अक्षरशः खिळखिळी असून, प्रवासादरम्यान तिचे छत उडत होते.खिडक्या दोरीने बांधलेल्या होत्या. ही बस कधीही अपघाताला कारणीभूत ठरू शकते.अकोले तालुक्यातील अनेक प्रवासी नोकरी निमित्त मुंबईला ये-जा करतात.

त्यांना कसाऱ्यातून पुढे प्रवास करण्यासाठी या बसेसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, अकोले आगाराने प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणतेही महत्त्व न देता मोडकळीस आलेल्या गाड्या सोडण्याचा प्रकार सुरू ठेवला आहे. विशेषतः भंडारदरामार्गे धावणाऱ्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक प्रवाशांना मुंबईच्या लोकल ट्रेनना मुकावे लागते.

पावसाळ्यात भंडारदरा आदिवासी भागामध्ये पाठवल्या जाणाऱ्या गाड्या गळक्या असतात. अशा परिस्थितीतचालक आणि वाहक यांना या बसेसमध्येच रात्र काढण्याची वेळ येते. भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्याचे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक बसेस सोडण्याची गरज असताना, विद्यमान बसेसची कपात करून त्या अन्यत्र वळविल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अकोले आगाराने तातडीने सुधारणा करावी व कसाऱ्याला सुस्थितीत बसेस पाठवाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe