अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही केल्या थांबायला तयार नाही. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान शिर्डी येथील सेंट्रल बॅंकेच्या शहरातील शाखेतील सर्व नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही शाखा बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली.
कोविड संसर्गामुळे एखाद्या बॅंकेची शाखा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात कोविड संसर्ग वेगाने फैलावत आहे. शहरात सध्या 33 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सेंट्रल बॅंक शाखेत प्रामुख्याने साईसंस्थान कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार सर्वाधिक होतात. गेल्या 9 सप्टेंबरपासून येथील कर्मचाऱ्यांना कोविडचा संसर्ग होण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोन-चार दिवसांतच सर्वांना बाधा झाली.
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग झाला. शाखेत कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागल्याने, कोपरगाव शाखेतून काही कर्मचारी येथे दाखल झाले. मात्र, त्यांनाही त्रास सुरू झाला.
शहरात कोविडचा फैलाव वेगाने होत आहे. बॅंकेत रोज 250-300 ग्राहक येतात. दैनंदिन दीड कोटींहून अधिक उलाढाल होते.
ग्राहकांची गर्दी असणाऱ्या शाखेतून आणखी संसर्ग फैलावण्याची धोका लक्षात घेऊन नगरपंचायतीने ही शाखा बंद करण्याबाबतचे पत्र बॅंकेला दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved