शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ यावर्षी पिकविमा भरला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम अदा केली जावी तसेच मागणी असेल त्या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री. घुले यांनी मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली असून, या यात्रेत लोकांचे प्रश्न व अडीअडचणी समजावून घेत आहेत, त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये पिक विमा विषयी प्रचंड असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे परंतू विम्याचे पैसे मिळाले नाहीत, काही ठराविक लोकांनाच विम्याची रक्कम मिळाली, असे श्री. घुले म्हणाले. खरीप हंगामात शेवगाव तालुक्यातील ४६ हजार ९७८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा भरला होता, त्यासाठी ९०८३४ अर्ज आले होते तर राज्य सरकारने या विमा पोटी २५ कोटी ५० लाख तर केंद्र सरकारने १३ कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम ओरिएंटल कंपनीकडे भरली होती.
एकट्या शेवगाव तालुक्यातून ३९ कोटी रुपये पिक विम्याच्यासाठी ओरिएंटल कंपनीला देण्यात आले. मात्र, कंपनीने फक्त चार कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, म्हणून शासनाने पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम अदा करावी.
यासंदर्भात आपण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार आहोत, असेही श्री. घुले म्हणाले. जनसंवाद परिवर्तन यात्रेत अनेक गावात विशेषता तालुक्याच्या पूर्वभागात तीव्र पाणीटंचाई असल्याचे निदर्शनास आले.
शासनाने ३० जून रोजी टँकर बंद केले, परंतु अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे, त्यामुळे या सर्व ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी माजी आमदार घुले यांनी केली. तसे झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल हेही उपस्थित होते.