तक्रार करणार्‍यांवरच पोलीस व गुंड दमबाजी करत असल्याचा आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नसून, या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधधंद्यांचा सुलसुलाट झाला आहे.

तसेच तक्रार करणार्‍यांवरच पोलीस व अनाधिकृत व्यवसाय करणारे गुंड दमबाजी करत असल्याचा आरोप करुन छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. सहा. पोलीस निरीक्षक यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास शनिवार दि.26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. टाळेबंदी काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी गुंडांना हाताशी धरुन पठाणी पध्दतीने अवाजवी हप्ता वसुली केली.

सदर फायनान्स कंपन्यांवर कारवाई होण्यासाठी दि.26 नोव्हेंबर रोजी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. फायनान्स कंपन्यांवर कारवाई संदर्भात चौकशीचे आदेश दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. दीपक चांदणे यांनी 5 डिसेंबर रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून योग्य तपास करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांना योग्य चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले व चांदणे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाठविले.

चांदणे यांनी सहा. पो.नि. बोरसे यांची भेट घेतली असता बोरसे यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकाविले व पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले. सर्वसामान्य नागरिकांना एका पोलीस अधिकारीकडून अशी अपमानास्पद वागणुक मिळणे निंदनीय बाब आहे.

बोरसे यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्यापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार व अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. गुन्हेगारांना अभय मिळाले असून, सर्व प्रकरणे दडपले जात आहे. पांढरीपुल, खोसपुरी शिवारात पोलीसांच्या आशिर्वादाने मटका, जुगार राजरोसपणे सुरु आहे.

ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्याचा उपयोग झालेला नाही, उलट तक्रारदारांना गुन्हेगारांकडून मारहाण झालेली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे नेमणुकीस व कार्यरत असलेले सहा.

पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24