११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी असल्याने नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जवळपास एक टीएमसी पाणी सुटणार असून प्रवरा नदीपात्रावरील सर्वच बंधारे भरून घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आ. ओगले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये केलेली मागणी शासनाने मान्य केल्याने आ. ओगले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे
