अहमदनगर बातम्या

MP Sujay Vikhe : नागरिकांच्या संपर्कात कमी असलो तरी विकास कामात कुठेही कमी पडणारा नाही – खा.सुजय विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

MP Sujay Vikhe : नगर-पाथर्डी मार्गे जाणारा कल्याण विशाखापट्टणम्, या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते, हे काम पूर्ण करण्यासाठी मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा होती,

विकासकामे मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्तीदेखील असावी लागते आणि माझ्या कार्यकाळात हा रस्ता पूर्णत्वास आला, याचे मला मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या गणपतीची महाआरती खा. विखे पाटील व आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आली, या वेळी ते बोलत होते.

कल्याण विशाखापट्टणम, राष्ट्रीय महामार्गाचे पूर्णत्वास नेल्याबद्दल खा. विखे यांचा व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी खा. विखे पाटील म्हणाले की, मी नागरिकांच्या संपर्कात कमी पडत असलो तरी विकास कामात कुठेही कमी पडणारा नाही.

नगर शहराचा उड्डाणपूल पूर्ण केला म्हणूनच दोन दिवसांपूर्वी नगर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी नगर शहरातील वाहतूक उड्डाणपुलामुळे सुरळीत सुरू राहिली. विकास कामे करताना दोन पाच लोक नाराज झाले तरी चालतील परंतु हजारो लोक या रस्त्याच्या कामामुळे समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

जांबकौडगाव, मेहेकरी या रस्त्याच्या कामासाठी आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे खा. विखे पाटील यांनी या वेळी सांगितले. तिसगाव येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी थोडा कटू निर्णय घ्यावा लागला असला तरी रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे.

Ahmednagarlive24 Office