अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-संगमनेर पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काल जोरदार निदर्शने करत गटविकास अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
दरम्यान गटविकास अधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात संगणक परिचालक संघटनेने म्हटले आहे, ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत,
पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून 10 वर्षे प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी केलेली आहे.
असे असताना संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला फाटा देऊन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार करणार्या
सीएससी एसपीव्ही याच कंपनीला परत काम दिले व संगणकपरिचालकांच्या मानधनात 1000 रुपये वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे.
शासनाने 14 जानेवारी 2021 रोजी चे दोन्ही शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावत, निदर्शने करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली.