अहमदनगर बातम्या

‘त्या’ प्राण्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि दहशतीचे वातावरण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :-राहाता तालुक्यातील केलवड हद्दीतील भारती प्रेमसुख डांगे यांच्या गट नंबर १९१ मधील उसाच्या शेतात दोन पिल्ले आढळून आली आहेत. ही रानमांजराची पिल्ले असल्याचा अंदाज वनविभागाने लावला आहे.

ही पिल्ले रानमांजराची की बिबट्याची बछडे! हा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे केलवड, दहेगावात भितीचे वातावरण आहे. दहेगाव येथील भारती डांगे यांची केलवड हद्दीत शेती आहे. त्या शेतात त्यांचा ऊस आहे. शनिवारी एका कारखान्याचे ऊस तोडणी कामगार उसाची तोडणी करत असताना त्यांना एका सरीत दोन पिल्ले दिसून आली.

ही बिबट्याची पिल्ले आहेत. असा अंदाज त्यांनी बांधून डांगे कुटुंबियांना कळविण्यात आले. कपील प्रेमसुख डांगे यांना याबाबत माहिती दिली. कपील डांगे यांनी केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी वनविभागाशी संपर्क करून माहिती दिली. फोटो काढून टाकण्यास सांगितले.

फोटोवरून ही रानमांजराचे पिल्ले असल्याचे वनविभागाने त्यांना सांगितले. वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी गाडे यांनी केलवडला येऊन भेट दिली. त्यांनीही पिल्ले रानमांजराची असल्याचे सांगितले. डांगे यांच्या म्हणण्यानुसार उसाच्या शेतात त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

त्यामुळे ही २-४ दिवसांची पिल्ले असल्याने नेमका भेद समजून येत नसल्याने हे बिबट्याचे बछडे असावेत असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला आहे. त्यातच हे पिल्ले आढळल्याने ऊस तोडणी कामगार दीड एकर ऊस तोडून राहिलेला अर्धा एकर ऊस तोडण्यास धजेना.

त्यामुळे ही रानमांजराची पिल्ले की, बिबट्याची बछडे ? हा प्रश्न निरुत्तरीत राहिला आहे, असे दहेगावचे माजी सरपंच भगवानराव डांगे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office