अहमदनगर बातम्या

पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न; नगर जिल्ह्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील तरुणीचे अपहरण, अत्याचार, लग्न, धर्मांतराच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत. तोच श्रीरामपूर तालुक्यातील एका विद्यालयात दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणाची केवळ पाच दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ओळख झाली होती.

अन याच ओळखीतून तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तो तरुण चक्क विद्यालयात येऊन धूमस्टाईलने या विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच शिक्षकांच्या सतर्कतेने हा प्रयत्न हाणून पाडला.

अगदी चित्रपटाला साजेशी घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे मात्र शिक्षक व पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत आधीक माहीती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात हि विद्यार्थिनी १० वीत शिकत आहे.

सॊमवारी सकाळी सर्व वर्गाचे क्लास सुरू असताना, मोटारसायकल स्टँडवर मोटारसायकल लावून अंगात पांढरा टी-शर्ट, पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणाने विद्यालयात प्रवेश केला. यावेळी त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक बाहेरच उभे होते.

येणार्‍या व्यक्तीकडे पाहत असतानाच समोरच्याने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचे नाव सांगून, मी तिच्या आत्याचा मुलगा आहे. तिला घेण्यासाठी आलो आहे. तिला तिच्या घरी भामाठाण येथे घेऊन जायचे आहे. विद्यार्थीनीस निरोप दिल्याने तिही वर्गाबाहेर आली.

एकमेकांना पाहिलेले नसताना, लगबगीने तो तरुण त्या विद्यार्थिनीजवळ गेला. तिच्याशी कुजबूज करू लागला. तेवढ्यात इतर शिक्षक वर्गाबाहेर असलेल्या मुख्याध्यापकांच्या सोबतीला आले. त्या दोघांचा संशय आल्याने त्या विद्यार्थीनीच्या घरी भामाठाण येथे मोबाईलवरून संपर्क साधला.

त्यांनी सांगितले आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही, अन् आम्हाला भाचाही नाही. शिक्षक स्टाफच्या हा प्रकार लक्षात आला. तेवढ्यात तो तरुण विद्यार्थीनीसह मोटारसायकलकडे जात असतानाच विद्यालयातील सेवकाने त्याची कॉलर पकडली. अन्य शिक्षकांच्या मदतीने त्यास ओढत कार्यालयात आणले. दरम्यान
विद्यालयात विद्यार्थीनीचे नातेवाईक देखील हजर झाले.

आजुबाजूला गजबजलेल्या परिसरात ही माहिती समजताच शेकडो तरूणांची विद्यालयासमोर गर्दी झाली. नंतर सदर तरुणास बंद खोलीत घेऊन संरक्षण देण्यात आले. कारण बाहेर तरूण आरडाओरड करून त्यास आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देण्यात आली. नंतर दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान त्या विद्यार्थ्यांचे वडील व नातेवाईक यांच्या विनंतीवरून मुलीचे पुढील भवितव्य पाहून पुढील कारवाई करण्यात आली नाही.

Ahmednagarlive24 Office