आंदोलन थांबविण्यासाठी पाच कोटींची ऑफर !  दरमहा पाकीट देण्याचेही आमिष; खा. लंके यांचा गौप्यस्फोट,आंदोलनाचा दुसरा दिवस

Published by
Ahmednagarlive24 Office
Ahmednagar News  :   मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रूपये देतो, महिन्यालाही पाकीट ठरवून देतो अशी ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट खा. नीलेश लंके यांनी केला. जर हे लोक पाच कोटी रूपये देत असतील तर हे पैसे कुठून आले ? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पध्दतीने कारभार सुरू असल्याचे लंके म्हणाले.
पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात खा. लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरातील नागरिकांनी लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात पोलीस अधिक्षकांशी दोनदा शिष्टमंडळाने चर्चाही केली, मात्र ती निष्फळ ठरली.
     यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याची दहा ते बारा वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते.
गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी ५०० दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते. ज्या विभागातून निलंबित झाला त्याच विभागात सबंधित पोलीस निरीक्षक त्या कर्मचाऱ्याला त्या विभागात बोलवून घेतो. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जातात. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले.
कागदोपत्री पुरावे  – खासदार  लंके
जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवैध धंदे वाढले असून त्यातून हत्या घडण्याचे प्रमाण वाढले आहे. चंदन तस्करी, लोखंड, स्टील, रेशनींग, गुटखा, कॅफे, वाळू, आयपीएल सटटा, गुटखा, पेट्रोल डिझेलची तस्करी, जुगार क्लब, वेश्या व्यवसाय, बिंगो हे अवैध व्यवसाय कसे हाताळले जातात याचीही आपल्याकडे सविस्तर माहीती आहे. बिंगो, आयपीएल सट्टा यामुळे अनेक तरूणांनी आपले जीवन संपविले आहे. सुवर्णकार व्यवसायीकांना मोठया प्रमाणावर त्रास दिला जातो.
कर्डीले ठरवितो कोणला कोणते पोलीस ठाणे !
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अतिशय चुकीच्या पध्दतीने कामकाज केले आहे. याच शाखेचा कर्डीले नावाचा कर्मचारी कोणत्या पोलीस ठाण्यात कोणता कर्मचारी बसवायचा हे ठरवितो. पोलीस अवैध व्यवसायांना पार्टनर आहेत याचेही पुरावे आपल्याकडे असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
ठोस निर्णयाशिवाय माघार नाही
चुकीच्या पध्दतीने काम करणारे अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत. तसेच जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. आंदोलनास किती दिवस लागतील हे माहीती नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय मी माघार घेत नाही.
पाच टक्के लोकांमुळे पोलीस यंत्रणा बदमान 
पाच टक्के लोकांमुळे इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे. सामान्य पोलीस कर्मचारी रस्तावर राहतो, काम करतो त्यांना पगाराव्यतीरिक्त इतर कोणताही लाभ मिळाला नाही. चार सहा लोकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा बदनाम केली असल्याचे लंके म्हणाले.
खा. लंके यांनी केली स्वच्छता
सोमवारी आंदोलन सुरू झाल्यानंतर रात्रभर खा. लंके यांना भेटण्यासाठी नागरीक येत होते. मंगळवारी पहाटे चार वाजता ते झोपले आणि सहा वाजता उठले. उठल्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी पाण्याच्या बाटल्या तसेच इतर कचरा स्वतः साफ करण्यास सुरूवात केली. लंके हेच काम करू लागल्यानंतर इतरांनीही त्यांचे अनुकरण केले.
लंके यांची प्रकृती स्थिर
जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीस विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर खा. नीलेश लंके, त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले मा. नगरसेवक योगीराज गाडे, अशोक रोहोकले यांच्या प्रकृतीची तपासणी केली. लंके यांच्या रक्तातील साखर काहीशी वाढली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. योगीराज गाडे यांचीही प्रकृती स्थिर असून अशोक रोहोकले यांच्या रक्तातील साखर मात्र वाढलेली आढळून आल्याचे वैद्यकिय पथकाने सांगितले.
Ahmednagarlive24 Office