आज रंगणार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रकट मुलाखत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एक तारखेपासून काँग्रेस बळकटीकरण सप्ताह राबविला जात आहे.

या अंतर्गत आज (दि.५ फेब.) विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा संवाद कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रकट मुलाखत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे घेणार आहेत. पाटील यांनी जिल्ह्यामध्ये पदभार स्विकारल्या नंतर अशा स्वरूपाचा हा त्यांचा शहरातील पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे.

पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाची गरज हा त्यांच्या मुलाखतीचा विषय आहे. यावेळी स्पर्धा परीक्षा समुपदेशक, पुण्याचे किशोर रक्ताटे हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षार्थीचे वर्तमान आणि भवितव्य या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

ना. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता बोरुडे मळ्यातील पंचशील नगर येथील मातोश्री उद्यान या ठिकाणी ही प्रकट मुलाखत रंगणार आहे.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. डॉ. बाळासाहेब पवार सर, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमाची विद्यार्थी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.

स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या त्याचबरोबर तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, सचिन वारुळे, योगेश ओस्वाल, धुळाजी महानवर, कु.शामल पवार, कु.किरण वाडेकर आदींनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24