अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-पोलिस अधिकारी एका मोबाईलच्या चोरीचा तपास करत असताना अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल दीड लाख रुपयांचे १९मोबाईलवर जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील आळेकर मळा येथील घराच्या टेरेसवर झोपलेल्या सुरेश आळेकर यांचा व शेजारी दीपक अनिल गणिशे या दोघांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.
याबाबत अक्षय सुरेश आळेकर याने श्रीगोंदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सरारईत गुन्हेगार महेश मंगेश काळे (वय २४ रा.कुळधरण हल्ली.रा.वांगी ता.करमाळा) याने केला असल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक ढिकले यांनी वांगी शिवरात काळे याच्या शोधासाठी पथके पाठवले असता त्यांनी या भागात सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले त्याला अधिक चौकशीसाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आनले.
यावेळी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हे केल्याची कबूली देत पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे व इतर ठिकाणी आजवर चोरलेले तब्बल १ लाख ५० हजारांचे १९ मोबाईल पोलिसांना दिले. ते सर्व मोबाईल जप्त केले असून त्याच्यावर श्रीगोंदा, पुणे, सोलापूरसह इतर विविध ठिकाणी तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत.