अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे,आमदार रोहित पवार यांच्या कर्जत तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश झाला असला तरी पोलिस आणि वन अधिकऱ्यांना तो सापडत नाही. त्याचे हल्ले सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
त्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत भाग घेतला. रात्रीही बिबट्या हाती लागला नसला तरी पवारांनी संवाद साधत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत.
या बिबट्याला पकडण्याकरीता कर्जतचे आमदार रोहित पवार हेही काठी घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्यांशी संवाद साधत माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सीमा भागातील गावांत गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा उपद्रव सुरू आहे.
आतापर्यंत त्या भागातील तीन जणांचे बळी गेले आहेत. अनेक जखमी झाले असून काहींचा थोडक्यात बचावही झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 5-6 जणांचा जीव गेल्याने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. यासाठी वन विभागाचे कर्मचारी सोलापूर, माळशिरस भागात गस्त घालत आहेत. करमाळा हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघाला लागून असलेला तालुका आहे.