अहमदनगर बातम्या

आणि अहमदनगर शहरातील लसीकरण वाढले ! जाणून घ्या त्या मागील कारण…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या omicron व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नगर जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणांचा वाॅच आहे.

नगर शहरात शुक्रवारी दोन जण अमेरिकेतून दाखल झाले असून त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरासह जिल्हाभरात १५ जण परदेशातून परतले आहेत.

दरम्यान मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी नगर शहरात सरासरी आठशे ते एक हजार नागरिकांचे लसीकरण केले जात होते. परंतु, आता मागील तीन दिवसांत दररोज सुमारे दोन ते तीन हजारांवर लसीकरण होत आहे.

शुक्रवारी नगर शहरात २ हजार २०७ जणांचे लसीकरण झाले. लसीकरणाचा वेग नवीन व्हेरिएंटच्यापार्श्वभूमीवर वाढल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ज्वर ओसरत असताना, आता omicron नावाच्या नवीन व्हेरिएंटने डोकेवर काढले आहे.

या व्हेरिएंटला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहरात शुक्रवारी दोन जण अमेरिकेहून परतले, त्यात एकजण आगरकर मळा व एक जण सावेडीतील आहे. दोघांची कोविड तपासणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले.

परंतु त्यांना १४ दिवसांसाठी होमक्वारंटाईन राहण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडून समजली. जिल्ह्यात परदेशातून कोपरगाव येथे २, राहाता ३, राहुरी ३, संगमनेर १, श्रीरामपूर ४ जण परदेशातून आले आहेत. इस्त्रायल, साैदी अरेबिया, दक्षिण कोरिया, हाॅगकाँग, आॅष्ट्रेलिया,

दक्षिण अफ्रिका, ब्राझील, कॅनडा, नायजेरिया, बोत्सवाला, रियुनियन, झिम्बाॅम्ब्वे या देशातून नागरिक परतले तर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. या देशातून नागरिक आल्यास त्यांना नटराज कोविड सेंटर अथवा जैन पितळे येथील कोविड केंद्रात निगराणीखाली ठेवले जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office