Anganwadi Bharti : संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळेपठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी (दि. १९) अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे.
याप्रसंगी सोनाली मेंगाळ, शांताबाई जाधव, सुमन केदार, लिलाबाई जाधव, कोंडाबाई केदार, चिमाबाई वारे, जयश्री जाधव, हिराबाई मेंगाळ, मिराबाई वारे, साक्षी जाधव उपस्थित होत्या. महिलांची उपस्थिती होती.
कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या गारोळेपठार येथे आदिवासी कुटुंबे राहत असून येथील मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी २०१७ साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली. तेंव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र आता या मिनी अंगणवाडीचे रुपांतर अंगणवाडी केंद्रात झाले. त्यामुळे आता या ठिकाणी मदतनीस पद भरण्यात आले. परंतू हे पद स्थानिक ठिकाणावरुनच भरले पाहिजे होते. मात्र तसे न करता या पदावर गावातील महिलेची नियुक्ती करण्यात आली.
भरतीबाबत कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळाली नाही. डायरेक्ट भरती होऊन मदतनीस या ठिकाणी हजर झाली. त्यामुळे स्थानिक महिला संतप्त झाल्या असून त्यांनी अंगणवाडीस काल मंगळवारी (दि.१९) टाळे ठोकले आहे.
जोपर्यंत मदतनीस या पदावर स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही. तोपर्यंत आम्ही टाळा खोलणार नाही. या अंगणवाडीसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेत. आणि स्थानिक वस्तीवरील महिलांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. या भरती बाबत ग्रामस्थांना माहिती देणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही, अशी तक्रार जयश्री मेंगाळ यांनी केली.