Ahmednagar News : अंगणवाडीच्या कंपाउंडची मागितलेली चावी न दिल्याचा राग येऊन अंगणवाडी सेविकेच्या हातातून चावी हिसकावून घेऊन फेकून मारली.
तसेच अंगावर धावून येऊन तिला शिवीगाळ करून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना नेवासा बुद्रुक येथे घडली. याबाबत अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंगणवाडी सेविका रेखा सुनील सोलट (वय ४३) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमच्या अंगणवाडीला शासनाने वॉल कंपाउंड केलेले असून शाळा सुटल्यावर अंगवाडीला तसेच वॉल कंपाउंडच्या गेटला कुलूप लावून चाव्या मी माझ्याकडे ठेवत असते.
दि . २ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास मी तसेच अंगणवाडी मदतनीस प्रिती राजेंद्र जाधव असे अंगणवाडी येथे असताना अंगणवाडीच्या आतमध्ये सचिन रतन धोंगडे हा आला व मला अंगणवाडीच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मागू लागला.
त्यावेळी मी त्यांना ही जागा शासनाची असून, त्या जागेच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मी तुम्हाला देऊ शकत नाही असे सांगितले. त्याचा त्याला राग आल्याने त्याने चाव्या हिसकावून घेवून फेकून मारल्या.
तसेच तुझ्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन, जर चाव्या या ठिकाणी ठेवून गेली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून सचिन रतन धोंगडे, रा. नेवासा बुद्रुक याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नेवासा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका रेखा सुनील सोलट यांना शिवीगाळ व धमकी देऊन कामकाज बंद केल्याचा निषेध करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन न्याय द्यावा.
या मागणीचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिले. तसेच सचिन धोंगडे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.