अहमदनगर बातम्या

संतप्त गुंतवणूकदारांनी शेअर व्यावसायिकाचे कार्यालय फोडले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेवगाव तालुका शेअर मार्केटचे हब म्हणून ओळखला जात असताना गेल्या महिन्यापासून यातील एक- एक शेअर मार्केटिंग व्यावसायिक कोट्यवधी रुपयांची माया घेऊन पलायन करताना दिसत आहे.

लाडजळगाव येथील घटना ताजी असतानाच गदेवाडी येथील एका शेअर मोर्केटिंग व्यावसायिक रविवार (दि.१४) रोजी पहाटे कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून फरार झाला असताना

आज (दि. १५) रोजी गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी आंतरवाली येथील एका शेअर मार्केटिंग व्यावसायिकाचे कार्यालय फोडून कार्यालयातील फर्निचर, लॅपटॉप, टेबल, खुर्चा, फॅन व इतर सर्व साहित्य लंपास केले आहे.

शेवगाव तालुक्यातील घोटणजवळील अंतरवाली येथे एका शेअर ट्रेडरने शेअर मार्केटचे कार्यालय उघडले होते, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या कार्यालयातून संबधित व्यावसायिकाने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली.

एक लाखाला महिन्याला १० टक्के व्याज मिळणार, या आशेने श्रीमंतांसह मजुर महिला, हातावर पोट असणाऱ्या महिलांनी सोनं, व्याजाने बचतगटाचे, उसणवारी करून पैसे गुंतवले. सुरवातीला महिन्याच्या महिन्याला व्याज मिळाले;

परंतु गेल्या महिन्यापासून एक एक शेअर मार्केटिंग व्यावसायिक गुंतवणुकदारांच्या हातावर तुरी देत गेल्याने पैसे देणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. गदेवाडी येथील एका शेअर मार्केटिंग व्यावसायिकाने इनव्हेस्टींग डॉट कॉम नावाने शेअर मार्केटसाठी पैसे गोळा केले.

गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या शेअर मार्केटच्या मोहजाळात अनेकजण अडकले आहेत. जास्त टक्केवारी देऊ केल्याने गदेवाडी बरोबरच चापडगाव, प्रभुवाडगाव, बोधेगाव, राक्षी, हातगाव, शेवगाव, खामपिंपरी, दहेगाव, हिंगणगाव या गावापर्यंत त्याचे लोन पोहचले आहे.

तालुक्यात १० टक्क्यांपासून १७ टक्क्यांपर्यंत दर महिन्याला व्याजाचा परतावा देण्याचे शेअर ट्रेडरकडून सांगण्यात येत असल्याने अनेक गुंतवणुकदारांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून यामध्ये लाखो रुपये गुंतवले. दर महिन्याला मिळणारा व्याजाचा पैसा आणि अलिशान ऑफिस पाहुन अनेकांनी सोने तारण, बचत गट कापुस विक्रीतून आलेले पैसे गुंतवले.

दरम्यान, तालुक्यातील एक व्यक्ती पळून गेल्यानंतर अनेकांनी गुंतवलेले पैसे परत घेतले; परंतु चापडगाव येथील एका शेअर व्यावसायिकाकडे गुतंवणुकदारांना देण्यासाठी पैसे नसल्याने त्याने विषारी औषधी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सोनविहीर येथील एक शेअर मार्केटिंग व्यावसायिक, लाडजळगाव येथील एक आणि आता गदेवाडी येथील शेअर मार्केटिंग व्यावसायिक रात्रीतून पसार झाला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Ahmednagarlive24 Office