अण्णा म्हणतात सरकारचे नको त्या गोष्टींकडे लक्ष ! माझे आयुष्य संपले तरी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला होता. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व उपआयुक्त सुनील चव्हाण यांनी हजारे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी उभयतांनी हजारे यांना, ‘उपोषण करू नये, तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा. या कायद्यात काही दुरुस्त्या हव्या असतील तर त्याही सांगा. आम्ही तसा बदल करू शकतो.

मात्र, आपण उपोषण करू नये,’ अशी विनंती केली. त्या वेळी हजारे यांनी, सरकार नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. दारूविक्रीतून महसूल वाढावा म्हणून दारूच्या किमती कमी केल्यात. माझे जीवन मी देशसेवा व समाजसेवेसाठी अर्पण केलेय. जगायचे ते समाजासाठीच त्यामुळे उपोषणावर मी ठाम आहे, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे.

यावेळी सावंत म्हणाले, की हा निर्णय शेतकरीहिताचा आहे. वाइन द्राक्षे, स्ट्रॉबेरी व जांभूळ यांसारख्या शेतीमालापासून तयार केली जाते. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला अधिक बाजारभाव मिळेल. शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल. वाइनची विक्री सर्रास दुकानांतून केली जाणार नाही.

राज्यात फक्त सहाशे ते सातशे दुकानांनाच परवाना दिला जाणार आहे. परवाने देताना शाळा, मंदिर यांपासून दूर असणा-या मोठ्या व नोंदणीकृत दुकानांना व दहापेक्षा अधिक नोकर कामाला असतील त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे.

यात अल्कोहोलचे प्रमाणही कमी आहे. तुम्ही या निर्णयात काही दुरुस्ती सुचवा, तशी दुरुस्तीही करू, अशी विनंती सावंत यांनी हजारे यांना केली. यावर हजारे म्हणाले, की उसापासून दारू बनते.

त्यात किती शेतक-यांचा फायदा होऊन ते सुधारले, असा प्रश्न उपस्थित केला. माझा तुमच्यावर रोष नाही. माझी मागणी मान्य केली तर ठीक, नाही तर या मागणीसाठी माझे आयुष्य संपले तरी हरकत नाही, असा निर्वाणीचा इशाराही हजारे यांनी दिला. या वेळी सरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे उपस्थित होते.