अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात असताना शहरात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबीराचे उद्घाटन कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवा देणारे व गरजूंसाठी आधार ठरलेल्या बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे व सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते झाले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, डॉ.इमरान शेख, नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ छायाचित्रकार राजू शेख, नफिस चुडीवाले आदिंसह पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली होती. राज्यात कोरोना आणि तत्सम आजाराने 42 पत्रकारांचे बळी गेले आहे. 400 पेक्षा जास्त पत्रकार पॉझिटीव्ह झाले होते.
पत्रकारांचे स्वतःच्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शासन आणि व्यवस्थापनाची पत्रकारांच्या बाबतची उदासिन भूमिका या पार्श्वभूमीवर परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या संकल्पनेतून हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून, राज्यभर विविध शिबीर घेऊन 5 हजार पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी त्यांच्या कुटुंबीयांसह केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. रफिक मुन्शी म्हणाले की, शोध पत्रकारितेचा वारसा जिल्ह्यातील पत्रकार चालवित आहे. कोरोना काळात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
पत्रकारांचे नेतृत्व करीत असताना सामाजिक भावनेने मन्सूर शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांचा दूरदर्शीपणा व बहुआयामी व्यक्तीमत्व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. देवदान कळकुंबे यांनी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या संकटकाळात नगरकरांच्या आरोग्य सांभाळले तर पत्रकारांनी समाज जागृतीचे कार्य केले. पत्रकारांच्या हातात लेखणीचे धारदारशस्त्र असून, शुध्द भावनेने केलेल्या पत्रकारितेने समाजाला दिशा दिली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटलने पोलीस व पत्रकारांच्या आरोग्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. झेंडीगेट येथे झालेल्या या शिबीरात नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची डोळ्यांची तपासणी केली. तर डोळे उत्तम राहण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरार्थींच्या डोळ्याचे नंबर तपासून त्यांना चष्म्यांचेही वाटप करण्यात आले. पत्रकारांनी या शिबिराचा सहकुटुंब लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved