Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील किसान बहुउद्देशिय शिक्षण संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विधी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी दिली.
याबाबत चेडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने किसान बहुउद्देशिय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीस सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.
पुढे किसान कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय सुरू करण्यात आले. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विधीच्या शिक्षणाची तालुक्यातच सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी लॉ कॉलेजला मान्यता मिळाली आहे.
विधी शाखेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून, १२ वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी विधी शाखेची सीईटी परीक्षा दिली आहे, त्यांना या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. अभ्यासक्रमासाठी सुसज्ज इमारत तसेच तज्ज्ञ अध्यापक वर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील मुले मुली शिकली पाहिजेत, या उद्देशाने किसान बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षणाची चळवळ उभी करून संस्थेने विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) सुरू केल्याचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले.