अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तर जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. भूषणकुमार रामटेके यांचे कडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करत निलंबन आणि सेवा समाप्ती चे आदेश काढले.
त्यानंतर आज मंगळवारी तोफखाना पोलिसांनी दाखल केलेल्या जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणाबाबत सदोष मनुष्य गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर आणि परिचारिका यांना अटक केली आहे.
दरम्यान नाशिक मंडळाच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी डॉक्टर पोखरणा यांच्या जागेवर जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषणकुमार अंबादास रामटेके यांची नियुक्ती केली आहे.
या पदाचा अतिरिक्त भार त्यांच्यावर असून ही नियुक्ती तात्पुरती असेल असे उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ यांनी लेखी आदेश काढून स्पष्ट केले आहे.