Ahmednagar News : अहमदनगर शहरातून अनेक हाणामारीच्या घटना अलीकडील काही काळात समोर आल्या आहेत. आता आणखी एक मारहाणीची घटना समोर आली आहे. महिलेसोबत झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला लोखंडी गज, घमेले, लाकडी दांडक्याने बेदम मारले आहे. ऋषभ संतोष भिसे (वय 21 रा. निंबोडी ता. नगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सध्या तो जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरातील श्रमिक बालाजी मंदिर येथे ही घटना घडली.
जखमी भिसे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगल दीपक देवराय, तिचा मुलगा नन्या दीपक देवराय व त्यांच्या सोबतचे आणखी दोघे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष हे बाळु जाधव या ठेकेदाराकडे तीन दिवसांपासून भिस्तबाग परिसरातील श्रमिक बालाजी मंदिर येथे काम करत आहेत. त्याच ठिकाणी मंगल काम करते. कामासाठी वापरण्यात येणार्या रबरी हँण्डग्लोजवरून त्यांच्यात वाद झाले.
या वादानंतर मंगल हिने फोन करून तिच्या मुलाला बोलून घेतले. येताना इतर मुलांना सोबत घेऊन येण्यास सांगितले. काही वेळात मंगलचा मुलगा नन्या तेथे आला. त्याने संतोष यांना लोखंडी गजाने मारहाण केली. नन्या सोबत आलेल्या इतर दोघांनी लोखंडी घमेले व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
‘तु जर पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोष यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.