अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घरातील महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांच्या वसाहतीमागे राहत असणाऱ्या घोगरे यांच्या वस्तीवर ही चोरी झाली.
शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. झोपेत असणाऱ्या तीन महिलांना उठवून गळ्याला चाकू लावून, मारहाण करून घरातील कपाटाची उचकापाचक केली व काही दागिने व रोख रक्कम मिळवली.
यानंतर महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण, कानातील दागिने, दोन मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथील नागरिक जमा झाले; परंतु तोपर्यंत चोर पसार झाले होते.
यानंतर या घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येऊन तपास केला; पण रात्रीची वेळ असल्यामुळे कोणीही सापडू शकले नाही.
शुक्रवारी सकाळी श्वानपथकाने तपासणी केली. याच भागात काही अंतरावर राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणीही घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक जागे झाल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.