अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे.
कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वात प्रथम आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली.
या बैठकीमध्ये थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा.
बाहेर पडताना मास्कचा वापर करा असे आवाहन थोरात यांनी केले आहे. थोरात म्हणाले की, राज्यात तिसरी लाट आली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
कोरोनामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपन लॉकडाऊनचा सामना करत आहोत.
लॉकडाऊनमुळे आधिच मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता जर लॉकडाऊन नको असेल तर सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे.