Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकीतील जळवाडी येथील मोबाईलधारकांना कुठल्याही टॉवरची रेंज मिळत नसल्याने सर्व सीम कार्डची होळी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
सध्याच्या काळात मोबाईल हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. विविध कामांसाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. असे असताना रेंज अभावी जळवाडीच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळकी येथे सर्व कंपन्याचे टॉवर उभारण्यात आले आहेत.
वाळकीपासून जळवाडी हाकेच्या अंतरावर आहे. परंतु येथील मोबाईल धारकांना कुठल्याही प्रकारची मोबाईल रेंज मिळत नाही. मोबाईल धारकांना रेंज मिळत नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्री अपरात्री वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास कसा संपर्क करायचा, तसेच चोरी, दरोडे सारख्या गंभीर गुन्हे घडत असताना एकमेकांना कसा संपर्क करायचा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय येथे जि. प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहे. त्यामुळे याच्याशी संबंधित सर्व ऑनलाईन कामे, शेतकऱ्यांची कृषी विषयक प्रकरणे, ऑनलाईन पिकपेरा नोंद, तातडीची वैद्यकीय सेवा आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात तेथील नागरिकांनी फ्रिकवेन्सी वाढविण्यासाठी विविध कंपन्याना तक्रार देखील केली आहे.
परंतु यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही यामुळे संतप्त नागरिकांनी रेंज च्या त्रासाला कंटाळून लवकरच सार्वत्रिक सर्व सिमकार्डची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाळकी येथे असणाऱ्या टॉवरची फ्रिकवेन्सी वाढवून द्यावी अन्यथा लवकरच सर्व सीमकार्डची होळी करणार असल्याचा इशारा गावातील मोबाईलधारकांनी दिला आहे.
कुठल्याही प्रकारची मोबाईल रेंज मिळत नसल्याने जळवाडी ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. आरोग्य, उपचार, चोरी, रात्री अपरात्री उद्भवणाऱ्या विविध समस्या, ऑनलाईन पिकपेरा नोंद आदी कामे करता येत नाहीत. त्यामुळे वाळकी येथील मोबाईल टॉवरची फ्रिकवेन्सी वाढवून द्यावी. (राजू ढगे, जळवाडी ग्रामस्थ )